हैरीटेज हैन्ड विविंग रीवाइवल चैरिटेबल ट्रस्ट हा हातमागाच्या विणकामकलेच्या पुनरुथ्थानासाठी बनविला आहे.
ब्रिटीशांच्या काळामधे आपली हातमागकला जवळजवळ संपुष्टात आली नव्हे मुद्दाम संपवली. आपणही ब्रिटीशांचं अंधानुकरण करत पॅावरलूमवर बनविलेल्या वस्त्रांच्या मागे लागलो व ही वैभवशाली परंपरा नष्ट करायला हातभार लावला. इंग्रजांचं तेच चांगलं असं वाटून आपल्याच देशातल्या कला आपल्याला अडचण वाटू लागल्या. याचा अपेक्षित परीणाम झाला व देशभरातले हातमाग हळूहळू कमी होत गेले.
कधीही भरून न येणारं हे नुकसान आहे. उभ्या आडव्या धाग्यांचा अप्रतिम मेळ घालणारे आपले विणकर व त्यांचे कुटुंब अर्धपोटी राहू लागले. आपल्याला हजारो रुपयांची अप्रतिम वस्त्रं देणारे हे दैवी हात इतर काम शोधू लागले. कोणी हमाली करू लागलं तर कोणी टॅक्सी चालवू लागलं… मिळेल ते काम करून अब्रू झाकण्याची वेळ आणली आपण या महान कलाकारांवर ! याचा तोटा विणकर समाजाला जेवढा झाला त्याहीपेक्षा जास्तं देशाला झाला. त्यांनी दुसरी कामं शोधली परंतु बंद पडत चाललेली ही कला पुढे कोण चालवणार? आपल्याला हे परवडणारं नाही .
या सर्व परीस्थितीचा विचार करूनच माझा एक छोटा प्रयत्न म्हणून मी पुण्यात पैठणी साडीचे हातमाग सुरू केले व केवळ उत्पादनावरच न थांबता नवीन विणकर तयार करण्यासाठी हा ट्रस्ट स्थापन केला. गेली तीन वर्ष विणकाम शिकवण्याबरोबरच शहरातील लोकांना हातमागाची माहिती व महती दोन्हीं कळावी यासाठी प्रयत्न करत आहोत. दरवर्षी “ हातमाग महोत्सव “ आयोजित केला जातो व हजारो लोक येऊन एक वस्त्र पूर्ण करतात. यामुळे उभ्या आडव्या धाग्याची जादू व विणकराचं महत्त्व लोकांना कळू लागलं. विणकर हा अडाणी माणूस नसून एक अत्यंत बुद्धीमान कलाकार आहे व कुठल्याही सुशिक्षित व विद्वान माणसापेक्षा कमी नाही याची जाणिव लोकांना करून देण्यात आम्ही यशस्वी झालो.
याच उपक्रमाचा एक भाग म्हणून अयोध्या राममंदिरातील रामरायासाठी वस्त्र विणण्याचा उपक्रम “ दो धागे श्रीराम के लिए “ १० ते २२ डिसेंबर २०२३ दरम्यान पुण्यात आयोजित केला आहे.
हा कार्यक्रम बऱ्याच चांगल्या गोष्टींचा संगम आहे.
पुण्यातील कोथरूडच्या पौड रस्त्यावरील सूर्यकांत काकडे फार्म्स येथे कार्यक्रम संपन्न होईल. भारताच्या सर्व राज्यांमधून एक एक हातमाग इथे येणार आहे. याचबरोबर नेपाळ व इतरही काही देशांमधून हातमाग येत आहेत. नेपाळमधील “ जनकपूर “ या सीतामाईच्या माहेरहून रामवस्त्रासाठी हातमाग योत आहे ही फार सुरेख कल्पना आहे.
दि. १० डिसेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता काही महानुभावांच्या हस्ते एका हातमागावर पहिले काही धागे विणून व होमहवनानी या अभियानाची मंगलमयी सुरूवात होईल. तदनंतर कोणीही येऊन या हातमागांवर आपल्या श्रद्धेचे व विश्वासाचे दोन धागे विणून जाऊ शकतील. अशा तऱ्हेने पुढील १३ दिवसांत या सर्व राज्यांची वस्त्रं लाखों लोकांच्या द्वारा संपूर्ण होतील व दि.२२ डिसेंबर रोजी लाखो भक्तांच्या हातांचा स्पर्श झालेली ही वस्त्रे श्रीराम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र न्यासाला सुपूर्द केली जातील.
इथे विणकामाबरोबरच इतरही खूप कार्यक्रम होणार आहेत. रोज सकाळ संध्याकाळ श्रीरामांची आरती होईल , होमहवन सुरू असेल , सकाळपासून दुपारपर्यंत अध्यात्मिक कार्यक्रम असणार आहेत. त्यासाठी विविध संप्रदायाचे गुरूजन येणार आहेत. संध्याकाळच्या सत्रात विविध महानुभावांची भाषणे , मुलाखती व इतर अनेक रंजक कार्यक्रम असणार आहेत.
या अभियानातून तीन महत्त्वाच्या गोष्टी साध्य होणार आहेत.
१) जानेवारी २०२४ मधे अयोध्येतील राममंदिराचे लोकार्पण होणार आहे. त्याच्या एक महिना आधीपासून एक मंगलमयी वातावरणाची सुरूवात होईल.
२) शहरांमधे हातमाग बघण्याची संधी मिळत नाही. या निमित्ताने लाखो लोकांना हातमागावर विणकामही करता येईल , हातमागाच्या वस्त्रांचं महत्त्व कळेल व आपल्या या महान कला व परंपरेविषयी मनात गौरव निर्माण होईल.
३) आपल्या देशात जातीपातीमधे भांडण आहेत. त्यामुळेनिर्माण होणारी भांडणं , दंगली व सामाजिक दरी ही देशासाठी घातक आहे.
या कार्यक्रमात सर्व जातीधर्माची लाखो लोकं एकत्र येऊन प्रभू श्रीरामासाठी वस्त्र विणणार आहेत. देशासाठी लोकांना एकत्र आणण्याचा प्रयोग खूपच कल्याणकारी आहे.
या कार्यक्रमात सर्व जातीधर्माची लाखो लोकं एकत्र येऊन प्रभू श्रीरामासाठी वस्त्र विणणार आहेत. देशासाठी लोकांना एकत्र आणण्याचा प्रयोग खूपच कल्याणकारी आहे.
यासाठी जास्तीत जास्तं लोकांनी एकत्र यावं व या देशाचे आराध्य असलेल्या श्रीरामासाठी दोन दोन धागे विणावेत …..