हैरीटेज हैन्ड विविंग रीवाइवल चैरिटेबल ट्रस्ट हा हातमागाच्या विणकामकलेच्या पुनरुथ्थानासाठी बनविला आहे.
ब्रिटीशांच्या काळामधे आपली हातमागकला जवळजवळ संपुष्टात आली नव्हे मुद्दाम संपवली. आपणही ब्रिटीशांचं अंधानुकरण करत पॅावरलूमवर बनविलेल्या वस्त्रांच्या मागे लागलो व ही वैभवशाली परंपरा नष्ट करायला हातभार लावला. इंग्रजांचं तेच चांगलं असं वाटून आपल्याच देशातल्या कला आपल्याला अडचण वाटू लागल्या. याचा अपेक्षित परीणाम झाला व देशभरातले हातमाग हळूहळू कमी होत गेले.
कधीही भरून न येणारं हे नुकसान आहे. उभ्या आडव्या धाग्यांचा अप्रतिम मेळ घालणारे आपले विणकर व त्यांचे कुटुंब अर्धपोटी राहू लागले. आपल्याला हजारो रुपयांची अप्रतिम वस्त्रं देणारे हे दैवी हात इतर काम शोधू लागले. कोणी हमाली करू लागलं तर कोणी टॅक्सी चालवू लागलं… मिळेल ते काम करून अब्रू झाकण्याची वेळ आणली आपण या महान कलाकारांवर ! याचा तोटा विणकर समाजाला जेवढा झाला त्याहीपेक्षा जास्तं देशाला झाला. त्यांनी दुसरी कामं शोधली परंतु बंद पडत चाललेली ही कला पुढे कोण चालवणार? आपल्याला हे परवडणारं नाही .
या सर्व परीस्थितीचा विचार करूनच माझा एक छोटा प्रयत्न म्हणून मी पुण्यात पैठणी साडीचे हातमाग सुरू केले व केवळ उत्पादनावरच न थांबता नवीन विणकर तयार करण्यासाठी हा ट्रस्ट स्थापन केला. गेली तीन वर्ष विणकाम शिकवण्याबरोबरच शहरातील लोकांना हातमागाची माहिती व महती दोन्हीं कळावी यासाठी प्रयत्न करत आहोत. दरवर्षी “ हातमाग महोत्सव “ आयोजित केला जातो व हजारो लोक येऊन एक वस्त्र पूर्ण करतात. यामुळे उभ्या आडव्या धाग्याची जादू व विणकराचं महत्त्व लोकांना कळू लागलं. विणकर हा अडाणी माणूस नसून एक अत्यंत बुद्धीमान कलाकार आहे व कुठल्याही सुशिक्षित व विद्वान माणसापेक्षा कमी नाही याची जाणिव लोकांना करून देण्यात आम्ही यशस्वी झालो.
याच उपक्रमाचा एक भाग म्हणून अयोध्या राममंदिरातील रामरायासाठी वस्त्र विणण्याचा उपक्रम “ दो धागे श्रीराम के लिए “ १० ते २२ डिसेंबर २०२३ दरम्यान पुण्यात आयोजित केला आहे.