दो धागे, श्रीराम के लिये

HHRTC    18-Sep-2023   
Total Views |
logo

प्रभू श्रीरामाच्या जन्मस्थळावर उभारल्या जाणाऱ्या भव्य राममंदिरासाठी, लाखोंच्या सहभागातून प्राण पणाला लावून केल्या गेलेल्या आणि संपूर्ण देशाला एका रामसूत्रात संघटीत करणाऱ्या दोन ऐतिहासिक कारसेवा आजवर देशाने अनुभवल्या.

अशाच प्रकारची अजून एक भव्य कारसेवा रामरायाच्या, अयोध्येत उभारल्या जात असलेल्या मंदिरात, विधिवत स्थानापन्न होणाऱ्या बटू राममूर्तीसाठी साकार रूप घेते आहे.

एक अद्भुत कार्यक्रम घडणार आहे भारतात, आपल्या पुण्यात...मंदिर उभारणी पूर्ण होऊन रामरायांची प्रतिष्ठापना झाल्यावर ते परिधान करणार आहेत ते प्रत्यक्ष रामललाचे वस्त्र आपण सर्वजण मिळून, आपल्या हातांनी, होय आपल्या हातांनी विणणार आहोत मंडळी....
 
हीच असणार आहे राममंदिरातल्या राममूर्तीसाठी पुन: एकवार आपल्या हातून होऊ घातलेली एक अनोखी कारसेवा....
 
१० ते २२ डिसेंबर २०२३ या बारा दिवसांत, देशभरातूनच नव्हे तर जगभरातून लाखो लोक पुण्यात येऊन, काकडे फार्म इथे थाटल्या जाणाऱ्या अनेक हातमागांवर, आपल्या रामरायासाठी वस्त्र विणणार आहेत.
 
प्रत्येक माणूस हातमागावर बसून फक्त श्रीरामाच्या कपड्यांसाठी दोन-दोन धागे विणणार असून, आपले हात लागलेल्या लोकसहभागातून निर्माण होणारी ही सर्व रेशमी वस्त्र ही प्रत्यक्ष प्रभू श्रीरामचंद्राच्या अंगावर नटणार आहेत....मंदिर उदघाटन झाल्यानंतर...जानेवारी २०२४ पासून पुढे...विविध वारी विविध रंगाची, देशात तयार होणाऱ्या विविध तलम रेशमांची, विविध राज्यांतल्या विविध प्रकारच्या हातमागांवर विविध विणकामांच्या शैलींनी विणली गेलेली शेकडो वस्त्र....
 
आपले वस्त्र सुद्धा आपल्या मंदिराप्रमाणेच लाखो लोकांच्या प्रत्यक्ष कारसेवेतून तयार व्हावे यासाठी भक्तीच्या भुकेल्या असणाऱ्या रामरायाचा आशीर्वाद असणारा हा अद्भुत उपक्रम यशस्वीरीत्या संपन्न होण्यासाठी गेली तब्बल दोनेक वर्ष या उपक्रमाची तयारी सुरु आहे.
 
shree
देशभारातून पुण्यात येऊन हे वस्त्र विणणाऱ्या लाखो भारतीयांच्या लोकसहभागातून निर्माण होत असलेल्या या उपक्रमाची सविस्तर माहिती देण्यासाठी, श्रीराम मंदिर जन्मभूमी ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी नुकतीच पुण्यात या संदर्भात पत्रकार परिषद घेतली आणि जगभरातल्या रामभक्तांना ही अद्भुत माहिती दिली.
 
अनघाजी घैसास यांनी पूर्वी केलेल्या रामलला वरच्या यशस्वी फिल्ममुळे आणि हातमागावार रेशमी वस्त्र विणण्याचा त्यांचा व्यवसाय असल्याने अयोध्येतल्या राम मंदिरातल्या श्रीरामाचं वस्त्र विणण्याच काम त्यांच्याकडे चालत आलं....जे खरतरं त्यांनी विलक्षण आनंदाने स्वीकारलं.
 
परंतु केवळ त्यांनी एकट्यानेच का रामरायाचं वस्त्र विणायचं, त्यापेक्षा संपूर्ण समाजाचे हात लागून प्रभू रामाचं वस्त्र विणून ते रामललाला वाहण्याची अभिनव स्वरुपाची ही कारसेवा करण्याची अनन्यसाधारण महत्व असलेली कल्पना अनघा घैसास यांना सुचली, आणि यथावकाश त्यांनी ही कल्पना राम-जन्मभूमी न्यासाकडे मांडल्यावर न्यासाने सुद्धा त्यांच्या या अभूतपूर्व उपक्रमाला आनंदाने संमती दिली.
 
काय असणार आहे “दो धागे श्रीराम के लिये”....

या बारा दिवसांत भारताच्या सर्व राज्यातून हातमाग पुण्यात येणार आहेतच, तसेच बाहेरच्या देशांमधूनही, म्हणजे श्रीलंका, जपान, म्यानमार, इंडोनेशिया, नेपाळ इथून देखील हातमाग या रामकामासाठी आणले जाणार आहेत.

केरळ आणि बेंगलोरमध्ये तयार झालेला उच्च जातीच्या रेशमाचा धागा यासाठी पुण्यात येणार आहे आणि या तलम रेशीमधाग्यांनी जेवढे हातमाग आहेत, तेवढी वस्त्र रामललासाठी तयार होणार आहेत.
प्रत्येक राज्याची जी विणकामाची अशी त्याची त्याची जी पारंपारिक खासियत आहे त्यानुसार त्या त्या राज्याचे वस्त्र त्याच्या हातमागावर विणलं जाईल. बनारस-सिल्क, ओरिसा-सिल्कवालं इक्कत, पोचमपल्ली हे पोचमपल्लीचं, हैदराबादचं गधवाल. पाटणची पटोला, वेस्ट बेंगालच मटका सिल्क किंवा जामदानी, आसामचं येतंय मुगा-सिल्क असे अनेकानेक राज्यांतले रेशमी वस्त्रांचे प्रकार इथे लोकसहभागातून विणले जाणार आहेत.
shree ram 
 
 
रामललासाठी हे सगळ करताना, हातमाग जसा लोकांपर्यंत पोहचावा, पॉप्युलर व्हावा हा अनघा घैसास यांचा मूळ उद्देश आहेच आणि त्यासोबतच विविध राज्यातली रेशमी वस्त्र ही सुद्धा, त्याच्या ओरिजनल माहिती सकट, प्यूअर फॉर्म मध्ये लोकांसमोर यावीत हा पण या विशाल कार्यक्रमाचा उद्देश आहे.
 
पुण्यात जिथे ही शेकडो वस्त्र विणली जाणारेत तिथे खास लोकांच्या माहितीसाठी प्रत्येक हातमागाच्या शेजारी त्या हातमागाच आणि त्यावर विणल्या जाणाऱ्या रेशमी प्रकाराचं व्यवस्थित इत्यंभूत विवरण लिहिलेलं असेल.
 
या निमित्ताने आपल्या देशाचं जे वैभव आहे, प्रत्येक राज्याचं सिल्क वेगळं, विणकाम वेगळं, हातमागाची डिझाईन्स वेगळी, हे इतकं सुंदर आहे. हे कुठल्याही देशात, या पृथ्वीतलावर नाही, जे आपल्या भारतात आहे. आणि म्हणून आपला देश अभूतपूर्व आहे. सगळ्या दृष्टीने. भाषा वेगळ्या, खाण पिणं वेगळं. एकच साडी पण ती नेसायची पद्धत प्रत्येक राज्यात वेगळी.
 
तर मग येताय ना, प्रभू श्रीराम जी वस्त्रे नेसून त्यांच्या भव्य अशा अयोध्येतल्या मंदिरात बसून जगाला आशीर्वाद देणार आहेत, ती वस्त्र प्रत्यक्ष तुमच्या हातांनी विणायला आणि ते देखील आपल्या पुण्यात...१० डिसेंबर २०२३ पासून २२ डिसेंबर २०२३ पर्यंत...
 
भेटूच ...
!! कल्याण करी रामराया !!